छत्रपती संभाजीनगरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजीम रवानी सय्यद आणि आशिया अजीम सय्यद जात होते. यावेळी सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात असणाऱ्या शिवसेना भवनासमोर त्यांच्या दुचाकीचा आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजीम सय्यद आणि आशिया सय्यद या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
तर दुसरीकडे धुळे सोलापूर महामार्गावरही भीषण अपघाता झाल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावरील हॉटेल गोदावरी समोर ट्रॅक्टर आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील तरुण तेजस जाधव जागीच ठार झाला असून एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. दुचाकीवरील ताबा सुटल्याने समोर जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.