समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. गुरुवारी (२५ जानेवारी) महामार्गावर चालकाला डुलकी लागल्यामुळं भरधाव ट्र्रँव्हल्सने कंटेनरला जोरदार धडक दिली होती. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास समृद्धीवर पुन्हा मोठा अपघात झाला.
भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाला डुलकी लागल्याने ट्रक अनियंत्रित होऊन समोरील टँकरवर धडकला. या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी बिबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक आणि टँकर मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील चेनेज ३१०.५ जवळ ट्रक आला असता, चालकाला अचानक डुलकी लागली. त्यानंतर काही क्षणातच ट्रक समोरील टँकरवर धडकला. हा अपघात इतका भीषण होता, की ट्रकच्या कँबिनचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत ट्रकमधील चालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरतोय आहे. नेहमीच होणाऱ्या भीषण अपघातांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव परिसरात ट्रँव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. चालकाला डुलगी लागल्याने हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.




















