पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहर पोलीस दलातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेय. पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस ठाण्यात चोरीचा माल परस्पर लंपास केल्याने ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्माचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली दिली.
सदर गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीसांनी या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. सदर प्रकरणी चौकशीसाठी वेळोवेळी पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावले होते. मात्र ते उपस्थित राहिले नाही, परिणामी कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
काल (सोमवारी) या ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्तांनी जाहीर केलीय. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केलाय. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी निलंबीत पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.