जालना (प्रतिनीधी) – जालना नगर परिषदेला महापालिकेचा दर्जा मिळाला असला तरी कारभारात मात्र कोणतीही सुधारणा झाली नाही अशा कडक शब्दात टीका करत काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी महापालिकेच्या कारभारावर हल्लाबोल केला आहे.
जालना शहरातील पाणी पुरवठा मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे कोलमडला असून अनेक भागात तब्बल १५ ते २० दिवसाला पाणी पुरवठा होत आहे.त्यातही जेमतेम अर्धा तासापेक्षा अधिक वेळ पाणी सोडले जात असून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील जनतेतून तक्रारींचा ओघ वाढला आहे. शिवाय घंटा गाडी देखील आठवड्यातून एक दिवस येत असल्याने शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
रस्त्यांवरील पथदिव्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.रात्रीच्या वेळी पथदिवे बंद आणि दिवसा सुरू असल्याचा हास्यास्पद प्रकार सध्या सुरू आहे.या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी आज सोमवारी जालना शहर महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन निवेदन देत उपरोक्त समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.यावेळी बोलतांना युवा नेते अक्षय गोरंटयाल म्हणाले की,जालना नगर परिषदेचे महानगर पालिकेत रूपांतर झाल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल,स्वच्छतेसह विकासाला गती मिळेल अशा वल्गना काही नेत्यांनी केल्या होत्या.मात्र,त्या फोल ठरतांना दिसत आहे.नगर परिषद अस्तित्वात असतांना शहरातील मुबलक व सुरळीत पाणी पुरवठा केला जात होता.तसेच शहरात स्वच्छतेला प्राधान्य देवून प्रत्येक प्रभागात दररोज घरोघरी जाऊन घंटागाडी द्वारे कचरा संकलन करून आवश्यक नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात होता.मात्र,नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर होऊन दर्जा बदलला असला तरी कारभारात मात्र कोणतीही सुधारणा झाली नाही.
उलट जबाबदारीचे भान नसल्याने महापालिकेचा कारभार ढेपाळला असल्याचा आरोप युवा नेते अक्षय गोरंटयाल यांनी केला आहे.पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करावा या आणि अन्य मागण्यांसाठी दि.३१ जानेवारी बुधवार रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत जालना शहर महानगर पालिकेसमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.त्यानंतरही महानगर पालिकेच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.या निवेदनावर युवा नेते अक्षय गोरंटयाल यांच्यासह माजी गटनेते गणेश राऊत,महावीर ढक्का,हरेश देवावाले,वाजेद पठाण,जगदीश भरतीया,रमेश गौरक्षक,विनोद रत्नपारखे,विनोद यादव,अरुण मगरे,राधाकिसन दाभाडे,सय्यद अझहर,शेख शकील,संजय भगत,किशोर गरदास,आरेफ खान,मोहम्मद नजीब,सोनू सामलेट,शेख वसीम,आनंद लोखंडे,योगेश पाटील,शेख अनस,दीपक जाधव,संतोष माधोवले,संजय पाखरे,संतोष खरात,करण जाधव,मनोज झिने,भास्कर रत्नपारखे,आकाश श्रीरामवार,राहुल यादव,विजय खंदारे,सागर पोटपत्रेवार,रणजित मगरे,मयूर भुरेवाल,सुशील चित्राल,अमोल गायकवाड,विकी वाघमारे,इम्रान चौधरी,समीर बागवान,मयूर चित्राल,गणेश वाघमारे,गणेश गिराम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.