पैसा, धन, संपत्ती सर्वांनाच हवी असते. अनेक व्यक्ती या सर्व गोष्टी कमवण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबतात. काहीजण एकमेकांच्या जीवावर देखील उठतात. अशात नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने संपत्तीसाठी आपल्या पतीलाच जीवे मारण्याचा कट रचलाय.
नाशिकच्या बोरगड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. अर्धांगिनीच आपल्या पतीच्या जीवावर उठली. संपत्ती हडपण्यासाठी पत्नीने आपल्या दोन साथीदारांची मदत घेतली. यावेळी तिने सुरूवातीला पतीला मारण्याचा प्लान आखला. ठरलेल्या प्लान प्रमाणे तिने दोन साथिदारांना घराजवळ बोलावले.
त्यानंर तिने आपल्या पतीला भरपूर बियर पाजली. पतीला नशा चढल्यानंतर पत्नीने पतीचा गळा आवळला. गळा आवळून पतीचा मृत्यू होत नसल्याने पत्नीने क्रूरतेने पतीच्या अंगावर साप सोडला आणि पतीला सर्पदंशही दिला.
सुदैवानं पतीचा जीव या घटनेत वाचला आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. या व्यक्तीची पत्नी एवढी क्रूर होती की तिने पतीच्या डोक्यात हेल्मेटनेही मारलं. रुग्णालयात पतीवर उपचार केले असून आता त्याची प्रकृती स्थीर आहे.
सोनी उर्फ एकता जगताप असं संशयीत आरोपी पत्नीचं नाव आहे. पोलिसांनी तिच्यासह अन्य दोन अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पती विशाल पाटील याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. म्हसरूळ पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे.