नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील कोडाईबारी घाटात नवापूर- पुणे बसला दुपारी अपघात झाला. रस्त्यावर पुढे चालत असलेल्या मालवाहू गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात बसमधील २० ते २२ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. चालक मोबाईलवर बोलत असल्याने अपघात झाल्याचे बसमधील प्रवाशांनी सांगितले.
नंदुरबार जिल्यातील नवापूर आगारातून राज्य परिवहन महामंडळाची बस पुणे जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. नवापूर बसस्थानकातून सुटलेली बस धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरून नवापुर, विसरवाडी, चिंचपाडा येथील प्रवासी घेवुन जात कोंडाईबारी घाटात आल्यानंतर उभ्या असलेल्या मालट्रकला मागून जोरदार धडक दिली. दुपारी १ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमधील २० ते २२ प्रवासी जबर जखमी झाले आहेत.
अपघातात जखमी काही प्रवाशांना दहिवेल, साक्री आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कोंडाईबारी महामार्ग सुरक्षा पोलीस, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे दाखल झाले. त्यांनी ताबडतोब महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. बस चालक मोबाईलवर बोलत असतांना समोर दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमी झालेल्या प्रवाशांनी दिली आहे.