कुंभारी (निर्मला जवळे) – महिला ही अबला नसून सबला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरवली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संसाराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य जीवन्नोती उमेद अभियानांतर्गत कुंभारी येथील हिरकणी महिला ग्रामसंघ विविध उपक्रम राबवत आहेत. असे प्रतिपादन सरपंच श्रुती निकंबे यांनी केले.
कुंभारी येथील करजगी गुरुमंदिर मठामध्ये उमेदच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन मोठ्या थाटात व उत्साहात पार पडले. यावेळी सीआरपी निर्मला जवळे यांनी महिलांना आर्थिक बचत व आरोग्य विषयी काळजी घेण्याबरोबरच आर्थिक सक्षमता हा कुटुंबाचा मोठा आधार असतो यासाठी महिलांनी बचत केल्यावर या बचतीचेयोग्य नियोजन करून कुटुंबाचा आर्थिक विकास घडवून आणावा असे मार्गदर्शन केले.
तनुजा जवळे यांनी उपस्थित महिलांना बचत गटाची दशसूत्री समजावून सांगितली. महिलांनी बचत गट व ग्रामसंघाच्या बैठकांना उपस्थित राहून आपले अधिकार समजावून घेतले पाहिजेत. आपल्या हक्काच्या मागण्या ग्रामपंचायत इकडे सादर केल्या पाहिजेत असे त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच श्रुती निकंबे व भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र होनराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंडियन प्रेस क्लबचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष इरण्णा गंचीनगोटे ग्रामपंचायत सदस्य अंजली पाटील, सुरेखा अंदोडगी, वृषाली तेली, कृषी व्यवस्थापक वैजीयंता मोरे, संगीता रेड्डी, कोमल सुतार,हिरकणी ग्राम संघाच्या सचिव ऐश्वर्या नाटेकर, अनिता भोररगुंडे, सीआरपी तनुजा जवळे, बँक सखी सुलक्षणा बिराजदार, श्रद्धा कुलकर्णी, रोहिणी कांबळे, सोनाली अल्लापुरे, शाहीन नदाफ यांच्यासह गावातील आलेल्या बहुसंख्य महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
याप्रसंगी मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले.