कुंभारी:- ( निर्मला जवळे ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे दोन गटांत झालेल्या मारहाण प्रकरणामुळे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गावातील वातावरण शांत ठेवण्यात पोलिसांनी नियंत्रण मिळविले आहे.
कुंभारीत घडलेल्या घटनेवर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी वळसंग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांच्या नेतृत्वाखाली एक अधिकारी, २० पोलिस अंमलदारांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वज्रसह दंगा नियंत्रण पथकाद्वारे गाव, वाड्या-वस्त्या, विडी घरकुल परिसरात रात्रंदिवस गस्त घालण्यात येत आहे. आरोपींचे अटकसत्र सुरू करून पीडितांना धीर देण्यासाठी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. यात कायदा हातात घेऊ नका न्याय मार्गाचे अवलंबन करा असे आवाहन केले. दरम्यान ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन घटनेची संबंध नसलेल्यांना यामध्ये विनाकारण गोवण्यात आल्याची खंत व्यक्त केली.
चौकशी करून निरपराधांवर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची पोलीस अधीक्षकांनी हमी दिली आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.