जालना :- दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली. दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, महानगर पालिका आयुक्त संतोष खांडेकर, समाजकल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले, शिक्षणाधिकारी (मा) मंगला धुपे आदींसह बांधकाम, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान केंद्र आवश्यक सोईंनी सुसज्ज केली जात आहेत. दिव्यांग मतदारांसाठी भारत निवडणुक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे ब्रिद वाक्य घोषित केले आहे. जालना जिल्हयाच्या विधानसभा मतदारसंघ निहाय दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 12 हजार 230 आहे. यापैकी परतूर विधानसभा मतदारसंघ निहाय पुरुष-1677, स्त्री-855, घनसावंगी-पुरुष-1430, स्त्री-871, जालना-पुरुष-1707, स्त्री-1366, बदनापूर-पुरुष-1266, स्त्री-821, भोकरदन-पुरुष-1324, स्त्री-913 दिव्यांग मतदार संख्या आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी सक्षम ॲप तयार केला असून याची माहिती दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचविण्यात यावी, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, मतदान केद्रांची दुरुस्ती करण्याबरोबरच दिव्यांग मतदारांना सुलभ पध्दतीने मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याची पाणी आदी व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी.