कुंभारी (निर्मला जवळे) – मुलाची लग्नाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या मातेचा अपघाती मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी मधील हॉटेल कामत जवळ ही घटना घडली. या अपघातात मृत्यू पावलेल्या मातेचे नाव ललिता काशिनाथ गाडेकर ( वय 48 )असे आहे.
कुंभारी येथील ललिता काशिनाथ गाडेकर यांच्या मुलाचा अठरा दिवसांवर विवाह येऊन ठेपल्यामुळे त्यांनी लग्नाच्या पत्रिका वाटण्याची लगबग सुरू केली होती. अक्कलकोटला एक कार्यक्रम उरकून रिक्षा मधून कुंभारीकडे निघाले होते. हॉटेल कामत जवळ रिक्षा थांबून जवळच शेतात असलेल्या आपल्या पाहुण्यांकडे लग्नपत्रिका देऊन पायी येत असताना रस्त्यावरील डिव्हायडर वरून वाहनाचा अंदाज न लागल्याने त्यांना सोलापूर ते अक्कलकोट कडे जाणाऱ्या ईरटीका कारची धडक बसली.अपघात स्थळी जमलेल्या नागरिकांनी त्यांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गाडेकर यांच्या अपघाती निधनामुळे कुंभारी गावावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी दहा वाजता त्यांच्यावर कुंभारी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात नवरा, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.