मध्य प्रदेशमधील हरदा येथील एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट (Blast) झालाय. त्यामुळे आजूबाजूच्या 60 हून अधिक घरांना आग लागली. सहा जणांचा मृत्यू झाला. कारखान्याच्या आजूबाजूला रस्त्यावर काही मृतदेह पडलेले आहेत. आतापर्यंत 100 हून अधिक लोकं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हरदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्रशासनाने आजूबाजूची घरे रिकामी केली आहेत. स्फोटाच्या धडकेमुळे वाहनासह अनेक पादचारी दूर फेकले गेले. अजुनही स्फोट सुरूच आहेत.
मध्य प्रदेशातील हरदा येथे आज सकाळी मोठा अपघात झाला. एका फटाक्यांच्या कारखान्यात अचानक आग लागली आणि स्फोट सुरू झाले. या स्फोटांमुळे तीन किलोमीटर अंतरापर्यंत भूकंप झाल्यासारखं वाटत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केलं. कारखान्याला लागलेली भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत, मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही.
घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत किती मनुष्यहानी व वित्तहानी झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आतापर्यंत मदत पथकांनी 20 हून अधिक लोकांना वाचवलं आहे. हे सर्व लोकं जखमी अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
माहिती मिळताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी डीएम हरदा यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. त्यांनी बचाव कार्याला गती देण्यास सांगितलं आहे. काही कारणास्तव कारखान्यात आग लागली आणि काही वेळातच आग तेथे ठेवलेल्या दारूच्या ढिगाऱ्यापर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताचे कारण शोधून त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
आगीनं संपूर्ण कारखान्याला वेढलं
यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आगीनं संपूर्ण कारखान्याला वेढलं होतं. फॅक्टरीतून आग वाढत असल्याचं पाहून आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला बोलवलं. यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आजूबाजूचा परिसर रिकामा करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
मदत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात अनेक लोकं अडकले आहेत. लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अपघाताच्या वेळी कारखान्यात किती लोक उपस्थित होते आणि आतापर्यंत किती लोक बाहेर आले, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.