कुंभारी :- ( निर्मला जवळे ) सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या काढणीची लगबग सुरू असतानाच उन्हाचा कडाका जाणवू लागला असून सद्यस्थितीत माळशिरस तालुक्यातील दोन व करमाळा आणि माढा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा चार गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी दुष्काळी परिस्थितीतील पाणीटंचाई व जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा आढावा घेतला. टंचाई काळासाठी पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारणासाठी ऑक्टोबर 2023 ते जून 2024 पर्यंतच्या आराखड्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंजुरी दिली आहे. या आराखड्यात नऊ उपायोजना सुचविल्या आहेत. त्यासाठी 55 कोटी 62 लाखाच्या किमतीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 1241 टँकरसाठी 43 कोटी 85 लाख इतका निधी लागणार आहे. टंचाई स्थितीमुळे गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सद्यः स्थितीत माळशिरस तालुक्यातील पिंपरी, भांब व करमाळा तालुक्यातील घोटी, माढा तालुक्यातील तुळशी अशा चार गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.