कुंभारी :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारीसह परिसरात कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि तापमानात झालेली वाढ, यामुळे विहिरी, तलाव कोरडेठाक पडले आहेत. परिसरात यंदा पाणी टंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे.
दक्षिण तालुक्यातील कुंभारीची लोकसंख्या31 हजार असून, या गावास हिप्परगा तलावातून कुंभारी व इतर सहा गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होत होती. मात्र गेल्या चार वर्षापासून हे पाणीपुरवठा योजना बंद झालेली आहे.
सध्या कुंभारी गावास रामपूर तलावा खाली असलेल्या विहिरी वरून होत आहे. मात्र सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत अत्यल्प पाणीसाठा आहे याबाबत 18 जानेवारी रोजी पंचायत समिती गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता यांना पाण्यासाठी टँकर मंजूर करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर मंडल अधिकारी, तलाठी यांनी रामपूरच्या जलाशयाची पाहणी केली. तलावाखालील विहिरींना यंदा पाणी नसल्याने परिसरात टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच जलसाठे कोरडे पडले असून, विहिरी आणि बोअरवेलने तळ गाठला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाण्यासाठी टँकर मंजूर करावा असा प्रस्ताव कुंभारी चे सरपंच श्रुती निकंबे, उपसरपंच राजकुमार कोरे, सदस्य पाठपुरावा करत आहेत.
गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.
कुंभारीला दरवर्षीच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हिप्परगा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा फायदा गावाला कधीच मिळाला नाही. गावात शाश्वत पाणी स्त्रोत नसल्याने पंचायत समितीने तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रामचंद्र होनराव यांनी केली.