जाफ्राबाद (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम व पारितोषिक योजना 2024 सध्या महाराष्ट्रावर राबवली जात आहे. त्या अंतर्गत विविध पारितोषिके घोषित केलेली आहे. तालुकास्तरावर ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय सिपोरा अंभोरा या शाळेने अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत बाजी मारत जाफराबाद तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्ह्यातील नामांकित गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी, सर्वाधिक पटसंख्या असणारी ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय सिपोरा अंभोरा या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या उपक्रमात भाग घेऊन मुख्याध्यापक श्री एस टी दिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ,शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक वृंद व सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेला स्वच्छ आणि सुंदर बनवून शाळेचा कायापालट केला आहे. तालुकास्तरावरील झालेल्या तपासणीमध्ये शाळेचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे. ही शाळा तीन लाख रुपयांच्या बक्षीस पात्र ठरलेली आहे. जिल्हास्तरीय तपासणी पथक मध्ये श्रीमती वडजे उपशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी देशमुख, गट शिक्षणाधिकारी सतीश शिंदे, विस्तार अधिकारी भालेराव यांनी शाळेत येऊन तपासणी केली. शाळेचा स्वच्छ परिसर, शाळेतील उपक्रम बघितले. शाळेची रंगरंगोटी, शाळेतील स्वच्छता, शाळेची मैदान, आरोग्य विषयक उपक्रम, स्वच्छता मॉनिटर, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, क्रीडा स्पर्धा, पोषण आहार योजना, स्काऊट गाईड पथक योजना, शालेय मंत्रिमंडळ, मेरी माटी मेरा देश, शाळा सजावट ,वर्ग सजावट कंपाउंड रंगरंगोटी या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व पालकांची मदत या सर्व बाबींची तपासणी केली. शाळेने राबवलेले उपक्रम, शाळेची स्वच्छता रंगरंगोटी बघून तपासणी पथकाने समाधान व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेशजी दिवटे सर सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थ्यांचे तपासणी पथकाने अभिनंदन केले.