जालना – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ही रविवार दि. 3 मार्च 2024 रोजी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. 5 वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस मिळाला पाहिजे, त्यासाठी पालकांनी खात्री करावी. नजिकच्या पोलिओ बुथवर जाऊन पोलिओ डोस घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता केले आहे.
तसेच आरोग्य विभागाने पल्स पोलिओची मोहिम प्रभावीपणे राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.एस. पाटील, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, समाज कल्याण अधिकारी एस.के. भोजने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नारायण पवार, आय. एम.ए. अध्यक्ष एम. डी. अंबेकर, आय. ए. पी अध्यक्ष डॉ. जेथलिया, वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह अधिकार्यांची उपस्थिती होती.
जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले आहे. त्या वर्षी जागतीक पातळीवर 3,50,000 रुग्ण आढळले होते. सन 2003 ला 1900 रुग्ण आढळले होते. त्यानंतर पोलिओ रुग्णाची संख्या 125 व त्यानंतर 7 रुग्ण आढळेत. रुग्णसंख्या ही मोहिम राबविण्यात आल्यामुळे कमी झाली असल्याचंही जिल्हाधिकारी यांनी म्हटलंय.