कुंभारी:-( निर्मला जवळे )लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच आतापासूनच रणनिती आखण्यात येत आहे. सध्या भाजपचे विद्यमान खासदार असतानाही त्यांच्याकडून अद्याप उमेदवारीबाबत वाच्यता केली जाईना. योग्यवेळी उमेदवार जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून आ. प्रणिती शिंदे यांच्या नावार शिक्कामोर्तब करुन प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारी निश्चित नसतानाही अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून प्रयत्न करत आहेत. यात कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे.
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी विद्यमान खासदार असले तरी तेच पुढचे उमेदवार असतील, याबाबत कोणताच सुतोवाच केला जात नाही. शिवाय अधूनमधून आ. विजयकुमार देशमुख यांच्या नावाची पुढी सोडण्यात येत आहे. यावरुन डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचे अॅड. शरद बनसोडे होणार, हे निश्चित मानले जात आहे. महास्वामी हेही विजयानंतर त्यांना मदत केलेलेले आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य महाराज, संत, महंत, शिवाचार्य, धर्माचार्य यांच्यापासून ते फारकत घेत स्वतंत्र चूल मांडली आहे. याचा फटका त्यांना बसण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे माझ्याकडे एससीचा दाखल आहे, असे सांगत खासदारकी लढविणार, असे सांगत सुटलेल्या आ. विजयकुमार देशमुख यांच्या दाखल्याची महास्वामींच्या दाखल्याप्रमाणेच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हा धोका ओळखून पक्ष त्यांना संधी देणार का हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. ऐनवेळी नवखा चेहरा समोर आणणल्यास यंदा भाजपची दाळ शिजणार नाही, हेही तितकेच सत्य आहे. माजी खा. अॅड. शरद बनसोडे, खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे दोन प्रयोग भाजपसाठी पुरेशे आहेत. तिसरा प्रयोग फसण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भाजपला विचार करुनच उमेदवारी द्यावी लागेल. आयात उमेदवाराला संधी दिल्यास भाजपचे कमळ कोमजून जाईल, अशी चर्चा सध्या लोकसभा मतदारसंघात रंगत आहेत.
श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडूनही होटगी विमानतळ सुरु झाले नाही. शहराचा पाणीपुरवठा, दुष्काळ निधी, गुंतागुंतीचे राजकारण, बाहेरच्या पक्ष्यांतील नेत्यांना सन्मान, स्वकीयांचा अपमान या गोष्टी लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करताना आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. समाधान आवताडे, माजी आ. प्रशांत परिचारक, मोहोळचे संजय क्षीरसागर, मार्डीचे शहाजी पवार आणि बंधू यांच्यासह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, शहर मध्य, शहर उत्तर, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यातील भाजपच्या पदाधिकार्यांच्या भावनेचा विचार होणे महत्त्वाचे आहे. भाजपच्या खासदारीकीच्या दोन टर्ममध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांचा विचारच झाला नाही, हे शल्य सतत कार्यकर्त्यांना बोचत आहे. याचा फटका यंदा भाजपला बसल्यास नवल वाटू नये. केवळ मोदींच्या कार्डवर कोणत्याही असक्षम उमेदवार जाहीर करुन निवडणुकीला सामोरे गेल्यास वैतागलेली जनता भाजपकडे पाठ फिरविण्याची दाट शक्यता आहे. दुष्काळ, कांदा अनुदान, कांदा निर्यात बंदी, पाणी टंचाई, वीज बिल, कर्ज माफी, शेततळे अनुदान, कृषीपूरक कर्जांच्या पुर्नगठणासह अन्य मुद्दे भाजपसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.