जालना – केवळ श्रीकृष्ण आणि विठ्ठल सोडले तर या पृथ्वीतलावर कोणीच परिपूर्ण नाही, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी अपूर्णत्व, कमतरता आहे. अडचणी, दुःख, संकटे, आल्यावर सुख-समृद्धी, ऐश्वर्य, कीर्ती, सन्मान न मागता भगवंताकडे दुःख मागणार्या कुंतीचे चरित्र आठवावे, भगवंताचे स्मरण आणि संत संगत केल्यास दुःख लवकर निवळते असे भक्ती आणि संत संगतीचे महत्त्व वृंदावन धाम येथील गोभक्त संजीव कृष्ण ठाकुर यांनी आज शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता पटवून दिले.
नाथानी परिवार आणि श्रीकृष्ण सत्संग सेवा समितीच्या वतीने देऊळगाव राजा मार्गावरील नाथानी ऑइल मिल परिसरात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सोहळ्यात गौ भक्त संजीव कृष्ण ठाकुर यांनी उपदेश केला. यावेळी त्यांनी पांडव चरित्र, राजा परीक्षित श्राप, भगवान सुखदेव आगमन, या प्रसंगांवर विस्तृत विमोचन केले. प्रारंभी नाथानी कुटूंबियांच्या हस्ते आरती करण्यात आली.
गौ भक्त संजीव कृष्ण ठाकुर म्हणाले, की, जीवनात चिंता केल्याने कठीण प्रसंग, समस्या दूर होत नाहीत तर चिंतेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आसक्ती, वासना, इच्छा हेच दु:खाचे मुळ कारण असून चिंतेच्या अग्नीत मनुष्य जन्मभर जळत असतो असे सांगून गुरु शिवाय मिळते ती केवळ माहिती असते आणि गुरु हे खरे ज्ञान देत असतात. भक्तीमुळे वेगळी दृष्टी निर्माण होते असे गौ भक्त संजीव कृष्ण ठाकुर यांनी सांगितले. यावेळी प. पू. मनोज महाराज गौड व नाथानी कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी महिला व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.