जालना – जालना येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चांगलाच गाजत असून, त्याची चौकशी करण्याची मागणी आजपर्यंत सामाजिक कार्यकर्ते श्रीकिशन झंवर यांनी वारंवार केली आहे. मात्र, त्याचा परिणाम होत नसल्याने अखेर श्री. झंवर यांनी या प्रकरणात राज्याचे लोकायुक्तांकडे दाद मगितली असून, त्याबाबत येत्या दि. 1 एप्रिल रोजी मुंबई येथे सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
जालना येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कोरोना काळात बोकाळलेल्या भ्रष्टाचार हा सामान्य जनतेपासून लपलेला नसून, अनेक विकास कामे करतांना निवीदा एका रकमेची आणि कार्यारंभ आदेश दुसर्याच रकमेचे देण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक हीत जोपासत अनेक अधिकार्यांनी या कामाचे बीलं वाढीव देण्याचा प्रताप केला आहे. त्याची अनेक उदाहरणे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह जिल्हाधिकारी आणि शासनातील जबाबदार अधिकार्यांच्या निदर्शनास आणुन देण्यात आले होते. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने सामाजिक कार्यकर्ते श्रीकिशन झंवर यांनी या सर्व भ्रष्टाचाराबाबत लोकायुक्तांकडे दाद मागितली होती. त्याबाबत झालेल्या तक्रारीची आयुक्तांनी पडताळणी केली असून, अखेर त्यात सुनावणी घेण्यास मान्यता दिली आहे. येत्या दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 11.15 वाजता आयुक्तांसमोर ही सुनावणी होणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांना बोलाविण्यात आले आहे. तसेच सुनावणीबाबत श्री. झंवर यांनाही कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील कुठल्या भ्रष्टाचार प्रकरणात लोकायुक्तांसमोर सुनावणी होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असून, या सुनावणीची तारीख निश्चित झाल्याने बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.
निकाल लागेपर्यंत लढणार – श्रीकिशन झंवर
बांधकाम विभागातील भ्रष्टाचार आणि एका रकमेची निवीदा व भलत्याच रकमेेचे बील अदा करण्याचे सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळेच आपण या प्रकरणात विशेष लक्ष घातले असून, त्याचा निकाल लागुन दोषींना शासन होत नाही तोपर्यंत लढणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीकिशन झंवर यांनी दिली आहे. तसेच केवळ अधिक्षक अभियंताच नव्हे तर लोकायुक्तांनी या प्रकरणात बांधकाम मंत्र्यांपासून जालना विभागातील शेवटच्या घटकापर्यंत चौकशी करावी. त्यात निश्चितच सत्य बाहेर येईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.