जालना । प्रतिनिधी – येथील जालन्यातील पत्रकार आणि दै. जगमित्रचे संपादक संतोष भुतेकर यांना फोनवरुन धमक्या आणि शिविगाळ करणार्या भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांचे तथाकथित कार्यकर्ते शिवाजी गायकवाड यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यासह संतोष भुतेकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी जालना जिल्ह्यातील पत्रकारांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपुर्ण देशात लोकसभेच्या निवडणुका आणि प्रचाराची रणधुमाळी जोरात आहे. जालन्यातील दै. जगाचा जगमित्र हे एक नियमित आणि प्रभावी वृत्तपत्र म्हणून जालना जिल्ह्यासह मराठवाडा परिसरात परिचित आहे. जालन्यातील बहुतांश पत्रकार आणि दृकश्राव्य माध्यमातील कर्मचारी कधीही एखांद्या ठराविक पक्ष संघटनेशी बांधीलकी किंवा विरोध म्हणून पत्रकारीता करत नाहीत.
दै. जगाचा जगमित्र आणि त्या वृत्तपत्राचे संपादक संतोष भुतेकर हे त्यांच्या वृत्तपत्रातून निवडणूक काळात विविध पक्ष संघटनांच्या बातम्या सातत्याने आग्रही भूमिकेतून प्रसिध्द करत आहेत. त्यांच्या वृत्तपत्रातील बातम्या संदर्भात एखाद्या पक्षाच्या-संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आक्षेप समजून घेण्यासारखा आहे. तथापि त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून प्रसिध्द केलेल्या भाजप उमेदवारांच्या संदर्भातील बातम्या वाचून संपादकांना थेट फोनवर धमकावणे, त्यांच्या माता-पित्यांचा शिवराळ भाषेत उल्लेख करणे, घरात घुसून मारण्याच्या तयारीने वाट्टेल ते वक्तव्य करणे या सर्व गोष्टी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून या संदर्भात संतोष भुतेकर यांनी त्यांना काल मोबाईलवर भाजपा कार्यकर्ते आणि उमेदवार श्री दानवे यांचे समर्थक शिवाजी गायकवाड यांनी केलेले वक्तव्य सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत ऐकवण्यात आले.
या प्रकरणी श्री भुतेकर यांनी ज्येष्ठ पत्रकारांच्या सल्ल्यानंतर संबंधीत चंदनझीरा पोलीस ठाण्यात दुरध्वनीवर शिविगाळ करणारे शिवाजी गायकवाड यांच्या विरोधात वास्तववादी तक्रार काल दाखल केली आहे. पोलीसांनी मात्र या प्रकरणी किरकोळ स्वरूपाचा अदखलपात्र गुन्हा दाखल करून पत्रकारांवर एकप्रकारे अन्याय केला आहे. शिवाजी गायकवाड यांनी केलेली शिविगाळ आणि त्याची रेकॉर्डींग आमच्यापैकी जवळपास सर्वच पत्रकारांनी नेमकेपणे ऐकली असून सकृतदर्शनी भाजपासारख्या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून असे वर्तन अपेक्षीत नाही. तसेच पोलीस आणि प्रशासनाकडूनही नेमकी कारवाई अपेक्षीत आहे. यास्तव आपण या गंभीर प्रकरणात लक्ष घालून संबंधीत आरोपीविरूध्द पत्रकार संरक्षण कायद्यान्वये योग्य तो गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधीत पोलीस ठाण्यास देण्याची आम्हा पत्रकारांची मागणी आहे.
दै. जगाचा जगमित्रच्या संपादकांना बातम्यांच्या अनुषंगाने धमकावणार्या शिविगाळ करणार्या आरोपी शिवाजी गायकवाड आणि त्याला फूस लावणार्यांवर योग्य कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्यान्वये नेमका गुन्हा दाखल करावा आणि संपादक संतोष भुतेकर यांना आवश्यक ते संरक्षणही देण्यात यावे. शिवाय असे प्रकार यापुढील काळात घडू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी पत्रकारांच्यावतीने करण्यात आली आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार सकलेचा, ज्येष्ठ पत्रकार मकरंद जहागिरदार, ज्येष्ठ पत्रकार भरत धपाटे, ज्येष्ठ पत्रकार अहेमद नूर, ज्येष्ठ पत्रकार श्रीकिशन झंवर, कृष्णा पठाडे, शेख महेजबीन यांच्यासह व्हाईस ऑफ मिडीयाचे जालना जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे, प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, सक्रीय पत्रकार समितीचे अध्यक्ष शेख इलियास, असो. स्मॉल अॅण्ड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे जालना जिल्हाध्यक्ष अमित कुलकर्णी, पत्रकार स्वाभीमान समितीचे सय्यद करीम, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक विनोद काळे, ऑल इंडिया संपादक संघाचे जालना जिल्हाध्यक्ष संतोष (प्रेम) जाधव, दिलीप पोहनेरकर, दीपक ढोले, सुयोग खर्डेकर, कैलास फुलारी, शेख चांद पी.जे. साहील पिठोरे, सय्यद अफसर, सुनील खरात, शब्बीर पठाण, अंकुशराव गायकवाड, शेख नजीर, शेख शकील, अक्षय शिंदे, अशपाक पटेल, नाजीम मणियार, दिनेश नंद, आमेर खान, शेख नजीर इनामदार, अतुल पडुळ, शेख मुजीब, श्रीधर कापसे, नाजीम सय्यद, शेख सलीम, विलास गायकवाड, राहुल मुळे, शेख मतीन, शिवाजी बावणे, लियाकत अली, शेख सलीम, प्रदीप दिव्यवीर, भगवान साबळे, विष्णू कदम, यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकारांची उपस्थिती होती.