जालना । प्रतिनिधी – जालना लोकसभेचा निवडणूक प्रचार चांगलाच रंगात आलाय. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील प्रचार सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे हे भाजपवर चांगलेच बरसलेत. भाजपच्या 10 वर्षाच्या काळात देशातील जनतेवर आलेली अवकळा त्यांनी समोर मांडली. भाजप सरकार केवळ थापा मारणारं सरकार असून या थापा मारणार्या भाजपला सर्वसामान्य जनता आता घरचा रस्ता दाखविणार असल्याचं डॉ. कल्याण काळे यांनी म्हटलंय.
विकासाच्या नावाखाली केंद्रातील भाजपा सरकारने मागील दहा वर्षात केवळ थापा मारण्याचे काम केले आहे. महागाई, बेरोजगारी वाढली असून मालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकर्यांसह सर्व सामान्य जनता ही भाजपला वैतागली असल्याने यावेळी भाजपला घरी बसवणार असल्याचा विश्वास जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास (इंडिया)आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांनी आज सोमवारी येथे बोलतांना व्यक्त केला.
जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आज सोमवारी बदनापूर तालुक्यातील रोषणगाव, बाजार गेवराई बाजार, शेलगाव जिल्हा परिषद गट व बदनापूर शहराची प्रचार सभा सोमठाना येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
याप्रसंगी जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, मा. आ. संतोष सांबरे, राजेंद्र राख, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, जयप्रकाश चव्हाण, बाबूराव पवार, भानुदासराव घुगे, बाबासाहेब डांगे, दीपक डोंगरे, भास्कर मगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना डॉ.कल्याण काळे म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.शेतकर्यांच्या मालाला हमी भाव देण्याचे आश्वासन दहा वर्ष सत्ता असतांना पाळले नाही.अत्यंत कमी भाव मिळत असल्याने मागील दोन वर्षापासून आपला कापूस आणि सोयाबीन शेतकर्यांनी घरात ठेवले आहे. भांडवलदार आणि उद्योगपतींचे लाड पुरविणार्या या सरकारने कामगार विरोधी कायदे अमलात आणून देशातील लाखो कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपाशी मारण्याचे काम केले असून नौकर्या, कामधंदे नसल्याने लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगारीचा सामना करत असल्याचे आपण नेहमीच बघतो आहोत. महागाईने कळस गाठला असल्याने सर्वसामान्य जनता घरगाडा सांभाळताना अक्षरशः वैतागून गेल्याचे चित्र मन सुन्न करणारे असून केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात देशात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावागावात प्रत्येक घरापर्यंत पोहचवून केंद्रातील भाजपा सरकारला खाली खेचण्यासाठी मतदारांशी संपर्क साधून महाविकास आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करावा असे आवाहन उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी केले आहे. तत्पूर्वी राजाभाऊ देशमुख, भास्करराव अंबेकर, डॉ. निसार देशमुख, माजी आ. संतोष सांबरे, बबलू चौधरी आदी मान्यवरांनी आपल्या भाषणातून केंद्र आणि राज्यातील सरकारच्या कारभारावर टीका करून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. सभेपूर्वी उमेदवार डॉ. कल्याण काळे आणि अन्य मान्यवरांनी बदनापूर तालुक्याचं दैवत सोमठाणा येथील माता रेणुका देवीची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. या कार्यक्रमास ठोंबरे, राम शिरसाठ, रमेश शिंदे, कैलास चव्हाण, विजय जर्हाड, भगवान कदम, लक्ष्मण म्हसलेकर, बाबासाहेब डांगे, अंकुश शिंदे, चितळकर, राजेंद्र जैस्वाल, शेळके, श्रीराम कान्हेरे, राजेंद्र शिनगारे, देहूजी जर्हाड, रामकीसन मेंढरे, अरुण पैठणे, शिवाजी कर्हाड, संभाजी शेळके, परमेश्वर गोते,भारत मदन, भास्कर शिंदे, पद्माकर पडुळ, संतोष नागे यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.