कुंभारी :- देशामध्ये लोकसभेची धूमधाम सुरू आहे. अशातच खरीप हंगाम वीस दिवसावर येवून ठेपला आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करून कृषी सहायकांमार्फत शेतकऱ्यांना बियाण्यांची आनुवंशिक व भौतिक शुद्धता तपासणीसाठी मोहीम हाती घेत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे.
कृषी विभागामार्फत कुंभारी येथे सन-२०२४ खरीप हंगामपूर्व नियोजन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या भागात सोयाबीन, उडीद पिकाचा जास्त पीकपेरा लक्षात घेता, बियाण्यांची उगवण क्षमता घरच्या घरी तपासून घरच्याच बियाण्यांचा वापर,लागवडीसाठी अष्टसूत्रीचा वापर, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार व पिकानुसार खतांचे नियोजन, मग्रारोहयो अंतर्गत जॉब कार्डधारक व पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांनी सलग आणि बांधावर फळबाग व वृक्ष लागवड, गांडूळ खत, कंपोस्ट खत, छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना इत्यादी घटकांतर्गत योजनेच्या लाभासोबतच, पेरणीपूर्वी बियाण्याला बीजप्रक्रिया करून पेरणी करणे. बीजप्रक्रिया ही अत्यंत साधी सोपी पध्दत पण तेवढीच महत्त्वाची आहे. कारण यावरच पिकाची उगवण क्षमता अवलंबून असते. हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे नियोजन, हवामानाचा अंदाज घेऊन कमी कालावधीचे वाणांची पेरणीकरिता निवड करणे, मूलस्थानी जलसंधारण करण्याच्या उद्देशाने पेरणी उताराला आडवी करावी, पट्टापेर-बीबीएफ इत्यादी पध्दतीने पेरणी करावी, जेणेकरून बियाण्यांची बचत होऊन अतिरिक्त पाऊस सरीवाटे वाहून जाण्यास मदत होईल. तसेच पिकांमध्ये कीड-रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत नियोजन करावे. त्यामुळे लागवड खर्च कमी होईल. ठिंबक व सूक्ष्मसिंचनाद्वारे खताचा वापर, नॅनो युरियाचा वापर करावा, असे कृषी सहायक सोनाली नाईकनवरे यांनी सांगितले. यावेळी सेंद्रिय शेती महिला बचत गटाच्या निर्मला जवळे, शर्मिला चांगले, रेणुका जवळे, गंगुबाई विजापुरे, लक्ष्मी जमादार उपस्थित होते . विशेष म्हणजे खरीप पेरणी पूर्वी कृषी विभागाने सुरू केलेल्या या बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया विषयी मार्गदर्शनामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवा
तृणधान्याचे आहारातील महत्त्व व मागणीचा विचार करता तृणधान्य पिकांची लागवड करावी. कुंभारी परिसरातील जमिनीमध्ये मृदा चाचणी अहवालानुसार सेंद्रिय कर्बाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, उदा. बोरु / ढेंचा इत्यादी पिकांची लागवड करण्याचे आवाहन नाईकनवरे यांनी केले.