जालना लोकसभा निवडणुकीत जालना हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. या जागेवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्यात थेट लढत होत आहे. गेल्या 20 वर्षांपासून दानवे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यावेळी कल्याणराव यांच्या रुपात त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले होते. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे जालन्यातील राजकारण चांगलेच बदलले. त्यामुळे यावेळी नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र येथे कल्याणराव काळे यांनी विजयी कामगिरी केली आहे. काळे यांनी दानवे यांचा1 लाख 9 हजार 958 मतांच्या फरकाने विजय झाला आहे.
सुरुवातीला या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचे पारडे जड मानले जात होते. जालना जिल्ह्यातील निवडणूक एकतर्फी होते की काय, अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या. पण ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली. कल्याणराव काळे यांच्यासाठी या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे प्रचाराच्या दिवसांत काहीचे चित्र बदलल्याचे दिसले. शेवटी कल्याणराव काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यात चुरशीची लढत होणार, असे मत व्यक्त केले जात होते.
2009 साल वगळता रावसाहेब दानवे यांनी 1999 सालापासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. दानवे हे भाजपचे एक अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. आपली ग्रामीण भाषाशैली आणि खुल्या व्यक्तीमत्त्वामुळे ते सामन्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. गेल्या 35 वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावला आहे. शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी येथे भाजपने मोठी यंत्रणा कामाला लावली होती. त्याचे परिणाम नेमके काय आणि कसे होणार? असे विचारले जात होते.
या मतदारसंघात मराठा समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मराठा आंदोलनासाठी झगडणारे मनोज जरांगे हे याच जिल्ह्यातील आहेत. सध्या ते मराठा सामजाचे नवे नेते म्हणून नावारुपाला आले आहेत. जरांगे यांनी अनेक सभा, उपोषणं याच जिल्ह्यात केली आहेत. त्यामुळे काही महिन्यांपासून जालना जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. जरांगे यांचा जालना जिल्ह्यातील मराठा समाजावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी या निवडणुकीत कोणतीही थेट भूमिका घेतलेली नाही. पण मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडा, असं आवाहन त्यांनी केलंय त्यामुळे आता मराठा समाज नेमकं कोणाच्या पाठीमागे उभं राहतोय. यावरच येथे विजयी उमेदवार ठरणार आहे. म्हणजेच या निवडणुकीत मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार असे म्हटले जात होते.