जालना लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडल्याबद्दल तसेच सर्वांच्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बुधवार दि. 5 जून 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सर्व मतदार, उमेदवार, पत्रकार यांचे आभार व्यक्त केलेत. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनीच उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी-कर्मचार्यांनी जबाबदारी व समन्वयाने निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पाडल्याबद्दल त्यांचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केलं.
जालना लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, दि. 13 मे 2024 रोजी मतदान पार पडले. जालना लोकसभा मतदार संघात जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. या सर्व मतदारसंघातील एकूण 2 हजार 61 मतदान केंद्रांवर सुमारे 13 लाख 61 हजार 226 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक रिंगणात 26 उमेदवार होते. जालना लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून रोजी जालना एमआयडीसीतील सरस्वती अॅटो कम्पोनन्टस प्रा.लि येथे पार पडली. या निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना विजयी घोषित करण्यात आले. यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन व मतमोजणी निरीक्षक प्रदीप अहलावत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचळ यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. मतमोजणीसाठी मोठया प्रमाणात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. सर्वांसाठी पाणी, पार्किंग, नाष्टा-भोजन व्यवस्था करण्यात आली होती. पत्रकारांसाठी स्वतंत्र मिडिया सेंटरची व्यवस्था करण्यात आली होती. मतमोजणी अतिशय शांततेत व सुरळीत पार पाडली. असेही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटलंय.