जालना शहरातील नवीन मोंढा भागात तेलाचं गोडाऊन फोडून लाखोचा एैवज लंपास करणार्या संशयीत आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून 5 लाख 33 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी आज गुरुवार दि. 6 जून 2024 रोजी दुपारी 1 वाजता दिली.
दि. 3 जून 2024 रोजी मुकेश मोतीलाल काबरा यांचे नवीन मोंढयातील गोडावुन फोडून सुमारे 4 लाख 57 हजार 856 रुपये किंमतीचे पॅराशुट, सफोला गोल्ड, निहार शांती अशा विविध तेलाच्या बॉटल चोरी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी तपास पथक तयार करुन गुन्हा गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तपास करुन शेख आसेफ शेख याकुब, रा. द्वारकानगर, जालना, विकास राम कुमकर, रा. द्वारकानगर जालना यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. त्यावर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली असून त्यांच्या सोबत आणखी दोन साथीदार असल्याचंही सांगीतलं. यावेळी त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला रु.2 लाख 31 हजार 650 रुपये किंमतीचा मुददेमाल, तसेच गुन्हा करतांना वापरलेला अशोक लेलॅण्ड कंपनीचे चारचाकी वाहन व रॉयल इन्फील्ड मोटार सायकल असा एकुण रु.5 लाख 33 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, रामप्रसाद पव्हरे, प्रशांत लोखंडे, सचिन चौधरी, योगेश सहाणे, सौरभ मुळे यांनी केलीय.