जालना जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करुन शिक्षकाला वेठीस धरण्यासाठी वेतन थांबविल्याची तक्रार गुरुवार दि. 6 जून 2024 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास दोन शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नसल्याने दि. 7 जुन 2024 पासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय.
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठीसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून हे उपोषण करण्यात येणार आहे. अतिरिक्त शिक्षक बाळासाहेब देविदास लहाने यांचे सहशिक्षक म्हणून विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदईएक्को ता. भोकरदन येथे तर प्रदीप विश्वनाथ राठोड यांचे सहशिक्षक श्री म. स्था. जैन विद्यालय जालना येथे आदेश काढून समायोजन करण्याच्या सुचना शिक्षणाधिकारी यांनी दिल्या होत्या. परंतु, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने संचमान्यतेत मंजूर असलेल्या पदा एवढेच शिक्षक कार्यरत असतांनाही तक्रारदार शिक्षकांचे नाव अतिरिक्त शिक्षक म्हणून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविले. त्यामुळे बाळासाहेब देविदास लहाने यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी जालना यांच्याकडे रितसर आक्षेप नोंदविला. परंतु, त्याचा काही एक विचार न करता त्यांना अतिरिक्त ठरवण्यात आले. इतर सर्व अतिरिक्त शिक्षकांचे वेतन व्यवस्थितपणे सुरू असतांना केवळ एका शिक्षकाचे वेतन गेल्या चार महिन्यापासून थांबविण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय. त्यामुळे या दोन्ही शिक्षकांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय.