एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खिळखिळ्या झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत 9 खासदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप आपला करिष्मा काय असल्याचे दाखवून दिले होते. गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांनी एक-एक करुन ठाकरे गटाचे खासदार, आमदार आणि नेते फोडले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटातील या गळतीला चाप बसेल, असा अंदाज होता. मात्र, ही अपेक्षा व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे. कारण, आता शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे नव्याने निवडून आलेले दोन खासदार गळाला लावण्याची तयारी सुरु झाली आहे. शिंदे गटाचे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आले होते. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या या दोन आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितले आहे. मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितले. मात्र, पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाईचा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असे या दोन खासदारांचे म्हणणे असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.