राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होतं आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 5 ते 8 जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर या भागात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ते 14 जून दरम्यान राज्यातील सातारा, सांगली, पुणे, कोकण, नगर, नाशिक, मुंबई या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई येथील काही भागात अतिवृष्टी होणार असा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या भागातही या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात आजपासून पावसाला सुरुवात झाली असून 14 जून पर्यंत राज्यात पाऊस सुरू राहणार आहे.