कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कांद्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं दरातही वाढ झाली आहे. याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. तर दुसरीकडं दरात वाढ झाल्यामुळं ग्राहकांना फटक बसत आहे. बकरी ईदचा सण जवळ आला आहे. त्यापूर्वी कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
15 दिवसांत घाऊक बाजारात कांद्याच्या दरात 50 टक्क्यांची वाढ
सध्या कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर घसरत होते. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. आता मात्र कांद्याचे दर वाढत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांत घाऊक बाजारात कांद्याच्या भावात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीत कांद्याच्या दरात 12 रुपयांची वाढ झाली आहे.
दिल्लीत 10 दिवसात कांद्याच्या दरात 12 रुपयांची वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरवड्यात कांद्याच्या दरात 30 ते 50 टक्क्यांनी वाढ झालीय. कारण, सध्या कांद्याचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळं दरात वाढ होत असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे बकरी ईदपूर्वी कांद्याची मागणी वाढली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी कांद्याची साठेबाजी सुरू केली आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार आपला हस्तक्षेप कमी करू शकेल, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे. दरम्यान, गेल्या 10 दिवसांत देशाची राजधानी दिल्लीत कांद्याच्या दरात तब्बल 12 रुपयांची वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातही कांद्याच्या दरात वाढ
महाराष्ट्रातही कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. राज्यातील अनेक घाऊक बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याचा भाव हा 30 रुपयांच्या पुढे गेला आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत हे अलीकडच्या काळात किमती वाढण्याचे मुख्य कारण आहे. जूनपासून बाजारात येणारा कांदा हा शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या साठ्यातून येतो. 2023-24 च्या रब्बी पिकाच्या संभाव्य घसरणीमुळे भाव वाढण्याची अपेक्षा असल्याने शेतकरी त्यांचा साठा उतरवत आहेत. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे कांदा होता त्यावेळी सरकारनं कांद्यावर निर्यातबंदी घातली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.
कांद्याच्या दरात वाढ होण्याचं कारण काय
सध्या कांद्याच्या दरात वाढ होत आहे. पण दरात वाढ होण्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर 40 टक्के निर्यात शुल्कामुळे कांद्याची निर्यातह कमी होत आहे. तर 17 जून रोजी होणाऱ्या बकरी ईदनिमित्त कांद्याला देशांतर्गत मागणी मजबूत असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिणेकडील राज्यांतून जोरदार मागणी आहे. कांद्याचे दर वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकार निर्यात शुल्क हटवू शकते, अशी आशा शेतकरी आणि साठेबाजांना आहे.