गावात स्मशानभूमी नसल्याने मृतदेह दफन कुठे करायचा? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संतप्त गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यात गावकऱ्यांनी चक्क ग्राम पंचायतीच्या आवारातच मृतदेह दफन करायला आणतो म्हणत गड्डा खोदण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गावातील सरपंचाकडून पोलिसांना पाचारण करून गावकऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न झालाय. मात्र, या निमित्ताने गावातील मूलभूत प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याचे समोर आले आहे. रोठा येथे घडलेल्या या प्रकारामुळे गावातील गावकऱ्यांनी स्मशानभुमीच्या मागणीकडे नव्याने आज लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामपंचायत आवारातच मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न
वर्ध्याच्या नजीक असलेल्या रोठा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागठाना येथे अद्याप स्मशानभूमि नसल्याने आयुष्याचा शेवटालाही यातना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र आहे. अशातच गावकऱ्यांनी गेल्या पाच वर्षापासून स्मशानभूमीची मागणी केलीय. मात्र अद्याप या मागणीला घेऊन प्रशासनाकडून कुठलीही प्रक्रिया झालेली नाही. आज गावातीलच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधी ज्या शेतात अंत्यसंस्कार केले जात होते, त्या ठिकाणी शेतकऱ्याचा मालकी हक्क असल्याने अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न निर्माण झाला.
परिणामी गावकऱ्यांनी गेल्या पाच वर्षापासून स्मशानभूमी बांधण्याची मागणी केली पण ती पूर्ण झाली नसल्याने आणि पुढील अंतसंस्कार करायचा कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. ज्यांच्याकडे शेत आहे ते शेतात अंत्यसंस्कार करतात परंतु मोलमजुरी करणाऱ्यांनी, ज्यांच्या कडे सोय नसलेल्यांनी नेमके अंत्यसंस्कार करायचे कुठे? असा प्रश्न गावकऱ्यांनी ग्राम पंचायत प्रशासनाला विचारलाय. तर आज आपल्या मागणीला घेऊन संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठत याच आवारातच मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला.