नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदाभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर आता देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये येणार आहेत.
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी पैशांची जुळवाजुळव करत आहेत. असे असतानाच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या नरेंद्र मोदी यांनी पीएम कशेतकरी सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी देण्यात आली आहे. मोदी यांच्या या निर्णयानंतर पुढच्या काही दिवसांतच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा केले जाणार आहेत.
पीएम शेतकरी सन्मान निधीच्या 17 व्या हफ्त्याला मंजुरी
गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 17 व्या हफ्त्याची वाट पाहात होते. पण आता नव्या सरकारची स्थापना होताच 17 वा हफ्ता मंजूर करण्यात आला आहे. आता पुढच्या काही दिवसांत पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना या पैशांची मदत होणार आहे.
2019 पासून शेतकऱ्यांसाठी खास योजना
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येते.