नाशिक : इयत्ता सहावीत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या विद्यार्थिनीचा शाळेत चक्कर आल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी पालकांनी शाळेवर असलेल्या मोबाईल टॉवरबाबत तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाने याबाबत दखल घेतली आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंटवाडी परिसरातील जगतापनगर येथील दिव्या त्रिपाठी ही मंगळवारी सकाळी शाळेत गेली होती. दिव्याला बरं वाटत नसल्यामुळे ती आसनस्थळी डोकं ठेवून बसली होती. तिला चक्कर आल्यामुळे ती बेशुध्द पडली आणि खाली कोसळली. शाळेकडून दिव्याच्या तब्येतीविषयी पालकांना तातडीने माहिती देण्यात आली. यानंतर वडील प्रतेश त्रिपाठी आणि शिक्षिका चैताली चंद्रात्रे यांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले होते.