छत्रपती संभाजीनगर: बिबट्याच्या हल्ल्यात एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथे मंगळवारी रात्री घडलेली घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ऋषिकेश विलास राठोड, असे मृत मुलाचे नाव असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांकडून मिळाली. ऋषिकेशचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मदतीच्या संदर्भातील पुढील प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडेल, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले.
ऋषिकेश हा आई-वडिलांसोबत गावाजवळच्या आश्रमात सत्संगासाठी रात्री गेलेला होता. तेथून तो नैसर्गिक विधीसाठी बाहेर पडला असता त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बाहेर गेलेला ऋषिकेश बराचवेळा आला तरी येत नाही, हे पाहून त्याच्या आई-वडिलांनी शोधाशोध केली. तरी तो आढळून आला नाही. ऋषिकेशचा गावकऱ्यांनीही रात्रभर शोध घेतला. अखेर बुधवारी सकाळी आश्रमापासून पाचशे मीटर असलेल्या शंभर फूट खोल नदीत रक्ताने माखलेला ऋषिकेशचा मृतदेह आढळून आला. त्याच्या संपूर्ण अंगावर बिबट्याच्या हल्ल्याचे ओरखडे आढळून आल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. कन्नड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी सुहास कुलकर्णी यांनी ऋषिकेशला तपासून मृत घोषित केले. कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार, धीरज चव्हाण, रवींद्र ठाकूर व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून घटनेची नोंद केली.