आठ सामने आठ विजय आणि टी२० विश्वविजेतेपदावर कब्जा. स्वप्नवत वाटावी अशी कामगिरी करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २००७ नंतर तब्बल १७ वर्षांनी टी२० वर्ल्डकपचा करंडक उचलला. या करंडकासह आयसीसी जेतेपदांचा दशकभराचा दुष्काळही भारतीय संघाने संपुष्टात आणला. कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी या आयसीसी वर्ल्डकपविजेत्या कर्णधारांच्या मांदियाळीत आता रोहित शर्माचाही समावेश झाला आहे. या विजयाचं अधोरेखित होणारं वैशिष्ट्य म्हणजे एकीचं बळ. कोणी एक खेळाडू या विजयाचा नायक नाही तर असंख्य नायकांची फौज या विजयाची मानकरी आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर भारतीय संघाने सर्वोत्तम प्रदर्शन केलं. भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाने गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपच्या फायनल लढतीत झालेल्या पराभवाचे व्रण पुसले गेले. टीम इंडियाने कसा साध्य केला विश्वविजय, कोणत्या मुद्यांवर दिलं लक्ष जाणून घेऊया.
फिल्डिंग या मुद्यावर भारतीय संघाने प्रचंड कसून मेहनत घेतल्याचं अख्ख्या स्पर्धेत दिसून आलं. फिल्डिंग कोच दिलीप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने छोट्यात छोट्या गोष्टींवर काम केल्याचं सातत्याने दिसलं. फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने बाऊंड्रीजवळ घेतलेला कॅच याचं सर्वोत्तम उदाहरण ठरावं. डेव्हिड मिलरसारख्या अव्वल फिनिशरसमोर ६ चेंडूत १६ धावा काढण्याचं आव्हान होतं. मिलरने हार्दिक पंड्याचा चेंडू जोरकस मारला पण सूर्यकुमारने वेगात पळत जाऊन बाऊंड्री नक्की कुठे आहे याचा अंदाज घेतला. आपण बाऊंड्रीपल्याड जाताना पाय लागणार नाही याची काळजी घेतली. शरीराचा कोणताही भाग बाऊंड्रीला लागणार नाही याची दक्षता घेत त्याने चेंडू आत टाकला आणि पुन्हा कॅच टिपला. अतिशय दडपणाच्या क्षणी सूर्यकुमारने प्रसंगावधान राखून कॅच घेतला. फायलनमध्येच कुलदीप यादवने कागिसो रबाडाचा घेतलेला कॅचही अफलातून असा होता. रबाडाने अतिशय जोरदार फटका मारला. कुलदीपने चेंडूचा वेग लक्षात घेऊन योग्य टायमिंगसह कॅच पूर्ण केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत धोकादायक ठरू शकणाऱ्या मिचेल मार्शला अक्षर पटेलच्या अचंबित करणाऱ्या कॅचने रोखलं. अक्षरने आयर्लंडविरुद्धही असाच एक कॅच घेतला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांचा कर्णधार बाबर आझमला सूर्यकुमार यादवच्या शानदार कॅचने माघारी धाडलं. अमेरिकेने अनुनभवी असूनही भारताविरुद्ध चांगला खेळ केला. या लढतीत मोहम्मद सिराजने नितीश कुमारला बाद करताना घेतलेला झेल क्रिकेटरसिकांच्या चिरंतन स्मरणात राहील. चेंडू वेगाने बाऊंड्रीपल्याड जाणार असं वाटत असतानाच सिराजने थरारक कॅच टिपला.