जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये स्टॉप डायरिया अभियान व स्वच्छतेचे दोन रंग या बाबत गृह भेटची मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी बुधवार दि. 10 जुलै 2024 रोजी सकाळी 12 वाजता दिलेत.
या संदर्भात जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळेचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, ज्योती कवडदेवी, कार्यकरी अधिकारी विद्या कानडे, विभागीय रासायनिक तज्ञ सुहास गजकोश, गट विकास अधिकारी डॉ. अमित कदम, गट विकास अधिकारी रमेश घोळवे, प्रशांत रोहनकर, संदीप पवार, लेखाधिकारी बालचंद जमधडे, ग्राम सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.बी. काळे यांची उपस्थिती होती.
या अभियानाच्या माध्यमातून शुद्ध पाणी निर्जंतुकीकरण करून पाणी पिण्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यात 1 जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 1 जुलै पासून पुढील दोन महिने स्टॉप डायरिया अभियान राबविले जाणार आहे. या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र ,सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया,गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होतात त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी गाव स्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
कार्यकारी अभियंता विद्या कानडे यांनी पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता विषयक बाबीवर जन जागृती , पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे बाबत सादरीकरण केले .तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी टीसीएल पावडर साठा ,पाणी तपासणी बाबत गाव पातळीवर पोस्टर, बॅनर्स लावणे, घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे याबाबत मार्गदर्शन केले . उप मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी प्रास्ताविकात अभियान कालावधी, या दरम्यान घेण्यात उपक्रम व त्याचे नियंत्रण या बाबत माहिती दिली .संवाद तज्ञ भगवान तायड यांनी स्वच्छतेचे दोन रंग या विषयी व स्वच्छता ग्रीन लीफ रेटिंग बाबत सादरीकरण केले व गावागावात समिती स्थापन करून त्याचा कामा बद्दल माहिती दिली. पाणी गुणवत्ता तज्ञ श्रीकांत चित्राल यांनी संपूर्ण मोहिमे बाबत सादरीकरण केले .तर ग्रामसेवक सर्व यंत्रणांना सोबत घेवून हे अभियान यशस्वीपणे राबवील असा विश्वास जिल्हाध्यक्ष काळे यांनी दिला.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जास्तीत जास्त गावे ओडीएफ अधिक करण्यासाठी स्वच्छता विषयी गावा गावात स्वच्छतेचे दोन रंग अंतर्गत कचरा संकलन करण्यासाठी कचरा कुंड्या वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. गावातील शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, येथे स्वच्छता जागृती कार्यक्रमाद्वारे ग्रामस्थांमध्ये कचर्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागृती निर्माण करणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचर्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे, यामध्ये कुजनारा व न कुजणारा कचरा यासाठी स्वतंत्र बकेटमध्ये ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. अंगणवाड्यामध्ये माता व किशोरी मुलींची स्वच्छता, आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणार्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता विशेष विशेष स्वच्छता संमेलन आयोजित करून स्वच्छता व स्वच्छते विषयी जाणीव जागृती करणे, गावामध्ये ग्रे वॉटर मॅनेजमेंट बाबत विशेष मोहीम राबवणे. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांना या अभियानामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. कार्यशाळेस गट विकास अधिकारी , तालुका वैद्यकीय अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, अंगणवाडी सुपर वायझर , आरोग्य सेवक ,ग्राम सेवक संघटनेचे पी. बी. पवार , श्रीमती डी .पी .भालके, यांच्यासह स्वच्छता अभियान कक्षातील सर्वतज्ञ , बीआरसी,स्वच्छागृही , जलसुरक्षक यांची उपस्थिती होती.
कार्यशाळा संपन्न करणेसाठी एन.डी.पाडेवार, नम्रता गोस्वामी, हिमांशू कुलकर्णी, संजय डोंगरदिवे, जय राठोड, सातपुते , व्यवहारे, झिने,चव्हाण ,श्रीमती खरात, यांनी परिश्रम घेतले.