राज्यातील अंशतः अनुदानित शाळा महाविदयालयांना 1 जानेवारी 2024 पासून पुढील वाढीव टप्पा देण्यात यावा तसेच प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करण्यात यावा अशी मागणी स्वराज्य शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली. यासाठी शुक्रवार दि. 19 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोर लाक्षणीक धरणे आंदोलन करण्यात आलं.
या आंदोलना दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दिपक केसकर यांना निवेदन देखील देण्यात आलंय. शाळेच्या अनुषंगाने 20%, 40% व 60 % अंशतः अनुदानित शाळा महाविदयालयांना 1 जानेवारी 2024 पासून पुढील वाढीव टप्पा देण्याची व प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आलीय. तसेच त्रुटीपात्र शाळांना समान टप्पा लागू करावा, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना वैद्यकिय प्रतिपुर्ती योजना लागू करावी, सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतलं.