मुंबई : धारावीचा भूखंड अदानीच्या घशात घालून मुंबईला अदानी सिटी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा डाव आहे. सरकारची लाडका मित्र किंवा लाडका काँट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती योजना सुरु आहे, अशी घणघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन महायुती सरकारला लक्ष्य केले.
निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे महाआघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडायला लागलेले आहे. त्यांना असं वाटतं की, त्यांनी आतापर्यंत जो काही कारभार केलाय तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजना बळी पडून यांना मतदान करेल. अशी त्यांची एक वेडी आहे. मग या योजनांमध्ये ‘लाडकी बहीण’ अशा बऱ्याच काही गोष्ट आहेत. बाकीच्या योजनांबाबत मी आज काही बोलणार नाही त्याच्याबद्दल जनता बोलते, जनता अनुभव घेते आहे. आज मी त्यांच्या एका योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना म्हणजे ‘लाडका मित्र’ किंवा ‘लाडका कॉन्ट्रॅक्टर’ किंवा ‘लाडका उद्योगपती योजना’. त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावी येथे मोठा मोर्चा काढला होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल धारावीकरांना त्यांच्या हक्काचा घर तिथल्या तिथे मिळालंच पाहिजे आणि ते सुद्धा 500 स्क्वेअर फुटाचं मिळालंच पाहिजे ही शिवसेनेची आधीही भूमिका होती, हीच भूमिका आजही आहे आणि उद्याही राहील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. धारावी ही केवळ एक नुसती झोपडपट्टी नाही तर एका त्याच्यात वेगळेपण आहे. ते वेगळेपणाचे इंडस्ट्रियल म्हणजे या प्रत्येक घरामध्ये एक मायक्रोस्केल उद्योग चालतो. मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी कुंभार पण आले, अगदी इडलीवाले आले, चामड्याचे उद्योग करणारे आले, बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या उद्योगधंद्यांचं का करणार, याप्रश्नी आम्ही एक मोर्चा काढला होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
गेल्या आठवड्यात काही बातम्या आल्या त्या बातम्या पाहिल्यानंतर या योजनांच्या सगळ्या फसव्या धोरण्यामागे सरकार त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचं ते चांगभलं करून इच्छित आहे. एकूण काय तर मोदी आणि शहा यांनी गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळवून गेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचे नावही बदलतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
अदानींना वारेमाप एफएसआय दिला जातोय. धारावीचा 590 एकरचा भूखंड आहे, त्यात 300 एकरवर घरं- गृहनिर्माण विभाग आहे. बाकी माहिम नेचर पार्क, टाटा पॉवर स्टेशन आहे. अदानीला दिलेल्या टेंडरमध्ये वाढीव एफएसआयचा उल्लेख नाही. आता तिथे सर्व घरांना नंबर देत आहेत, म्हणजे पात्र अपात्रतेच्या निकषात अडकवून घरं रिकामी करायची, धारावीकरांना हाकलून लावायचं, धारावी रिकामी झाली की ती अदानीच्या घशात घालून भूखंडाचं श्रीखंड ओरपायचं, नागरी संतुलन बिघडवण्याचं काम सुरु आहे, हे टेंडर रद्द करा, पुन्हा पारदर्शक पद्धतीने टेंडर काढा आणि योग्य माणसाला द्या, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.