जालना तालुक्यातील सेवली येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यपान करुन येणार्या शिक्षकाला निलंबीत करण्याचे यावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसापुर्वी विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर हा विषय मांडला होता. त्यावर दि. 23 जुलै 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी सदरील शिक्षकाला निलंबीत केल्याची माहिती बुधवार दि. 24 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता सुत्रांनी दिलीय.
शाळेत कार्यरत असतांना मद्यप्राशन करणे, वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशाचे पालन न करणे या व इतर कारणामुळे सेवली येथील जिल्हा परिषद प्रशालेत कार्यरत असलेले माध्यमिक शिक्षक रामेश्वर कुंडलिक काकड यांना निलंबीत करण्यात आलंय. वारंवार तक्रारी करण्यात आल्या नंतरही काकड यांच्याविरुद्ध जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी या प्रकरणी संबंधित शिक्षकाला अनेकवेळा कारणे दाखवा नोटीस बजावली होती, मात्र, नोटीसा बजावण्यात आल्यानंतरही सदर शिक्षकाच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी चौकशी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या अहवालानुसार चुकीची माहिती देणे,अध्यापन न करणे, विहित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण न करणे, शाळेत गांजा-विडी, सिगारेट पिऊन नशेमध्ये राहणे, वारंवार अनाधिकृत गैरहजर राहणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे व सुचनांचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे, मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक तसेच पालकांशी अरेरावीची भाषा करणे, शालेय व्यवस्थापन समितीला व पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल न देणे, विद्यार्थ्यांचा सवार्ंगिण विकास साधण्यास असमर्थ ठरणे, शालेय अभिलेखे अपूर्ण ठेवणे, शिक्षक पदास विहीत केलेली कर्तव्ये व जबाबदार्या यांचे पालन न करणे, शासनाची दिशाभूल करून नियमबाह्य वैद्यकिय देयक मंजूर करून घेणे आदी गंभीर दोषारोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. त्यामुळे हे निलंबन करण्यात आलंय.
असून महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 चे तरतूदींचा भंग करणारे आहेत. यासर्व आरोपांची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी माध्यमिक शिक्षक रामेश्वर कुंडलीक काकड यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश बजावले आहेत.निलंबन कालावधीत संबंधिताचे मुख्यालय गटशिक्षणाधिकारी कार्यलय, पंचायत समिती,भोकरदन जि.जालना येथे ठेवण्यात येत असून संबंधितास गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा जालना यांच्या पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबन कालावधीत कोणताही खाजगी व्यवसाय किंवा व्यापार करता येणार नाही असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.