जालना शहरातील गांधीनगर, अर्जुन नगर ते रोहनवाडी बायपास रोडचे काम होत नसल्याने मोठ्या प्रमाणात चिखल झालाय. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरीकांनी जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केलीय. बुधवार दि. 24 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजता त्यांची भेट घेऊन निवेदन देखील देण्यात आलंय.
बालाजीनगर-गांधीनगर-अर्जुन नगर ते रोहनवाडी बायपास रोडची अत्यंत दयनीय अवस्था झालीय. या भागातील नाल्यांचे घाण घाण पाणी रस्त्यावर येत आहे. शिवाय या भागातील नाल्या देखील स्वच्छ केल्या जात नाहीत. रस्त्यावरुन चालतांना चिखल तुडवावा लागतोय. अत्यंत दुषीत पाण्यातून रस्ता काढावा लागत असल्याने स्थानिक नागरीकांना साथीच्या आजारांना सामोरं जावं लागतंय. लहान मुले व वृद्ध आजारी पडलेलेत.
सदरील रस्त्याचा वापर शाळेचे मुले, पादचारी आणि वृद्ध नागरीक करीत असून शहरातून बायपास रोडला बाहेर पडण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. शिवाय या रस्त्यावर स्मशानभुमी असल्याने अंत्यविधीसाठी देखील नागरीकांना मोठी कसरत करावी लागते आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळ करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी शहेबाज अंन्सारी, बशीर शेख, इरफान खान, मदीन सय्यद, राम सुर्यवंशी, सुनिल अंभोरे, शेख जुबेर, सैफ अन्सारी, वसीम शेख, किरण बिच्छोरे आंदीची उपस्थिती होती.