मुंबई : ‘वंशज’ फेम अभिनेता माहिर पांधी याच्यावर मुंबईत गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुंडांनी गाडीची तोडफोड करण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केल्याचं माहीरने सांगितलं आहे. माहीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या हल्ल्यातून तो सुरक्षितपणे बचावला असल्याचं त्याने सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुंबई खरंच सुरक्षित आहे का, असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.
‘वंशज’ टीव्ही मालिकेमधील भूमिकेसाठी ओळखल्या जाणारा अभिनेता माहिर पांधीला याला मुंबईत संकटाचा सामना करावा लागला. अभिनेता माहिर पांधीवर गुंडांच्या एका गटाने हल्ला केला . गुंडांनी त्याच्या गाडीची तोडफोड करत लुटण्याचा प्रयत्न केला. माहीरने या घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. सुदैवाने माहीर गाडीमध्ये नसताना हा हल्ला झाला, असं असलं तर या परिस्थितीमुळे आपल्याला असुरक्षित वाटत असल्याचं माहीरने म्हटलं आहे. या घटनेमुळे सार्वजनिक जागांवर सुरक्षिततेबद्दल आणि वाढीव सुरक्षा उपायांचं महत्त्व वाढलं आहे.
दरम्यान, या धक्कादायक घटनेतून बचावल्यानंतर माहिरने सर्वांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. माहीरने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आज माझ्यावर दिवसाढवळ्या दोन गुंडांनी हल्ला केला. त्यांनी खिडक्या तोडण्याचा प्रयत्न केला आणि गाडीचे आरसे तोडले. हा रोड रेज नव्हता. हा तोडफोड करण्याचा खरा प्रयत्न होता आणि लुटण्याचा प्रयत्न होता.”
माहिरने पुढे सांगितलं की, या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिस करत आहेत. दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने त्याने मुंबईतील सुरक्षेवर सवाल उपस्थित केला आहे. “मुंबई खरंच सुरक्षित आहे का?” असा प्रश्न माहीरने विचारला आहे.