जालना/प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ जालना आणि विवेकानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. 28) सकाळी 10 ते 1 या वेळेत मोफत गुडघे विकार आणि हाडांची ठिसूळता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विवेकानंद हॉस्पिटल येथे होणार्या शिबिरात आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त, गुडघे विकार आणि हाडांचे निष्णात तज्ञ डॉ. सिद्धांत गोयल हे तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर शिबिरात गुडघ्यांचे आजार, हाडांची ठिसूळता, गुडघेदुखी ,संधिवात, गुडघ्यांच्या सांध्यांची घसरण, गुडघ्यांचा वाकडेपणा, कॅल्शियम आदी तपासण्या करण्यात येतील. सोबतच अन्य तपासण्यांवर विशेष सवलत मिळणार आहे. जालन्याचे भूमिपुत्र असलेले डॉ. सिद्धांत गोयल यांनी दिल्ली, जपान, जर्मनी ,स्विझर्लंड आदी ठिकाणी गुडघे, हाडांवर संशोधन, प्रशिक्षण, अभ्यास करून सेवा दिली असून, सध्या छत्रपती संभाजीनगर येथे ते कार्यरत आहेत. जालना शहरात रोटरी क्लब ऑफ जालना यांच्या पुढाकाराने त्यांच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्याचा स्थानिक रुग्णांना लाभ व्हावा, या दृष्टिकोनातून मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, जालना शहर आणि जिल्ह्यातील रुग्णांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष डॉ. दीपक बगडिया, सचिव इंजि. रवी भक्कड, प्रकल्प प्रमुख डॉ. चारुदत्त हवालदार, विवेकानंदचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. डी. सचदेव, संचालक डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ. चारुस्मिता हवालदार, डॉ. सतीश गोयल, डॉ. अनिल कायंदे, डॉ.माधुरी पाकणीकर, डॉ. पूजा कायंदे आदींनी केले आहे.