नवी दिल्ली : बंगळुरूच्या कोरमंगलामधील एका पीजीमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. एका 24 वर्षीय तरुणीवर एका आरोपीनं पीजीमध्ये घुसून सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. पीजीमध्ये राहणाऱ्या आणि मुळची बिहारची असणाऱ्या 24 वर्षीय तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला शनिवारी मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. अभिषेक असं आरोपीचं नाव असून त्यानं 23 जुलैच्या रात्री कृती कुमारीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर त्यानं मध्य प्रदेशात पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीच्या ओळखीचाच होता.
पोलिसांनी फरार आरोपीला मध्य प्रदेशातील भोपाळमधून अटक केली आहे. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. एका खासगी कंपनीत काम करणारी 24 वर्षीय तरुणी हल्लेखोराच्या मैत्रिणीची सहकारी होती. तरुणी हल्लेखोराला आधीपासूनच ओळखत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता व्हीआर लेआऊटमध्ये असलेल्या पीजीमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्या मजल्यावर असलेल्या तिच्या खोलीतून तिला बाहेर खेचून चाकूनं तिचा गळा चिरला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
दक्षिण पूर्व पोलीस उपायुक्त कार्यालय आणि कोरमंगला पोलीस स्टेशनपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वेंकटरेड्डी लेआऊटमध्ये असलेल्या भार्गवी स्टेइंग होम्स फॉर लेडीजमध्ये ही घटना घडली. तरुणी आणि आरोपी एकमेकांना आधापासूनच ओळखत होते. महिलेची मैत्रिण आरोपीची एक्स गर्लफ्रेंड होती. पण काही कारणानं त्यांच्या नात्यात तडा पडला आणि त्यामुळे दोघे वेगळे झाले. त्याच रागातून आरोपीनं हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याला प्रेयसीची हत्या करायची होती, पण त्यानं चुकून तिच्या मैत्रिणीला मारल्याचंही बोललं जात आहे.