ब्राह्मण समाजातील विवाह इच्छुक मुले-मुली आणि पालकांनी पॅकेज, पुणे, मुंबईला प्राधान्य देण्यापेक्षा घराणे आणि संस्कारला महत्त्व द्यावे अशा भावना अखिल भारतीय पेशवा संघटना आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात व्यक्त करण्यात आल्यात. रविवार दि. 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.30 ते 5 या वेळेत सर्व शाखीय ब्राह्मण समाजाचा वधू-वर सुचक मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी पालकांनी या भावना व्यक्त केल्यात.
ब्राह्मण समाजामध्ये विशेष करून मुलांचा विवाह जुळविण्यासाठी पालकांना युद्धपातळीवर प्रयत्न करून जीवाचे रान करावे लागत आहे. प्रत्येक मुलीसह तिच्या आई-वडिलांची विशेष करून आईची इच्छा असते की, आपल्या मुलीला पुणे, मुंबई, नाशिक आदी महानगरांमध्ये स्थळ मिळावे तसेच मुलाला चांगले पॅकेज, परदेश जाण्याची संधी आणि छोटे कुटुंब याला प्राधान्य दिले जात आहे. परंतु यामुळे अनेक प्रश्न समाजात निर्माण झाले आहेत. मुलीने आणि तिच्या आई वडिलांनी चांगले घराणे, नात्यातील माणसे असतील तर त्याला प्राधान्य द्यावे असा सूर मान्यवरांनी अखिल भारतीय पेशवा संघटना आयोजित वधू- वर परिचय मेळाव्यात रविवारी अळविला.
ब्राह्मण सभा भवन येथे हा वधू-वर परिचय मेळावा पार पडला. याचे उद्घाटन समाजसेवक रमेश देहेडकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ बलवंत नाईक, अखिल भारतीय पेशवा संघटनेचे अध्यक्ष सचिन वाडे, परशुराम जयंतीचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, मैत्रेय ग्रुपचे संतोष दाणी, प्रा. पवन देशमुख, डॉ.सुभाष भाले,महेश वझरकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुनील किनगावकर हे होते.
यावेळी रमेश देहेडकर यांनी हा वधू वर परिचय मेळावा म्हणजे पालक मेळावा बनत चालला आहे. ही बाब समाजासाठी चांगली नाही. वधू वरांनी देखील आपल्या पालकांसोबत येथे येणे अपेक्षित होते. परंतु तसे होत नसल्याने आगामी काळात हे टाळले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिन वाडे यांनी केले. चंद्रकांत कुलकर्णी यांनीही ब्राह्मण समाजामध्ये अनेकजण खाजगी नोकरी, व्यवसाय, शेती करतात. त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. केवळ पुणे, मुंबईचाच हट्ट न धरता छोट्या गावांमधील होतकरू तरूणांचाही मुलीसह तिच्या आई-वडिलांनी विचार करण्याची भावना व्यक्त केली.




















