छत्रपती संभाजीनगर : आंब्याच्या आडीतील एकच आंबा खराब असतो, पण तो इतर सर्व आंबे खराब करतो, त्यामुळे आंब्याची आडी खराब होणार नाही याची मी खबरदारी घेईन असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं. अजित पवारांसोबत गेलेले विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश केला.
अजित पवारांसोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांसोबत येण्यास उत्सुक असल्याच्या राजकीय चर्चा आहेत. त्यापैकी बाबाजानी दुर्रानी हे आता परत आले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी शरद पवार म्हणाले की, पक्षप्रवेश होताना कोणीतरी म्हटलं की सर्वांना पुन्हा घेऊ नका. पण मला माहीत आहे की आंब्याच्या आडीतला एकच आंबा खराब असतो, तो इतर सर्व आंबे खराब करतो. त्यामुळे आडी खराब होणार नाही याची मी खबरदारी घेईल.
अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पक्षात घेणार का असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, अनेकांना वाटत आहे रस्ता चुकला आहे, त्यामुळे परत यावं असे वाटत असेल. काही लोकांनी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्याबद्दल सरसकट निर्णय घेण्याची मानसिकता आमची नाही. ज्यांनी टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबाबत विचार करणे सुरू आहे.
मोदींना देशाचा इतिहास बदलायचा आहे
आज देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात आहे असं सांगत शरद पवार म्हणाले की, गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं, यांना देशाचा इतिहास बदलायचा आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात यांचा थोडाही वाटा नाही. गेल्या निवडणूकमध्ये मोदींनी काय केले .या देशाच्या संविधानावर घाला घालण्याची तयारी त्यांनी केली होती. संविधानावर हल्ला करण्याचं काम त्यांनी केले. समाज एकसंघ राहिला पाहीजे हे सूत्र त्यांना मान्य नाही. त्यामुळे यांच्या हातात सत्ता जाणं हे मान्य नाही.
गेल्या 10 वर्षात देशात जातीवाद
राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात परतलेले आमदार बाबाजानी दुर्रानी म्हणाले की, साहेबाना सोडून गेलेले अनेकजण पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत, ते शून्य झालेत. बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो. गेल्या 10 वर्षात देशात जातीवाद पसरवला. आज शरद पवार यांच्याकडे मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षने पाहत आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सत्तापरिवर्तन होणार आहे. आम्ही कुठेही असलो तरीही आतून शरद पवार यांच्यासोबत होतो आणि त्यांना मदत देखील केली. जोपर्यंत देशात परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपणास दीर्घायुष्य मिळावे.