जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात शनिवार दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलेल्या एका युवकाला बिबट्या दिसून आल्याने त्याची पाचावर धारण बसली, हिंस्त्र पशु बिबट्या पाहिल्याने त्याला धडकी भरल्याने ताप देखील आला. परंतु, आढळून आलेला पायाच्या ठस्यावरुन सदरील प्राणी हा बिबट्या नसून तो तडस असल्याचं वन विभागाच्या अधिकार्याकडून सांगण्यात आलंय.
गेल्या काही दिवसापासून जालना वन उद्यानात हिंस्त्र पशुचा वावर आढळून आल्याचा बोर्ड वनविभागाच्या अधिकार्यांनी त्यांच्या गेटवर लावलाय. त्यामुळे वन उद्यान बंद देखील करण्यात आलंय. परंतु, हा हिंस्त्र पशु कोणता आहे याची मात्र वनविभागाच्या अधिकार्यांनी खात्री दिली नाही. असे असतांनाच दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास कन्हैयानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील प्रज्योत भालेराव या युवकाने पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास बिबट्या पाहिल्याचा दावा केलाय. तर वन विभागाच्या अधिकार्यांनी त्याचा दावा खोडून काढला असून आढळून आलेल्या पायाच्या ठस्यावरुन तो तडस असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं सांगीतलंय. घटनास्थळी लहान आणि मोठे पायाचे ठसे आढळून आल्याने दोन हिंस्त्र प्राणी असल्याचं दिसून येतंय. तरीही नागरीकांनी रात्री-अपरात्री काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाच्या अधिकार्याकडून करण्यात आलंय.