जालना शहरालगत असलेल्या इंदेवाडी परिसरातून एका संशयीत आरोपीस पिस्टलसह अटक करण्यात आलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी केल्याची माहिती सायंकाळी 7 वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिलीय.
जालना जिल्ह्यात अवैधरीत्या गावठी पिस्टल बाळगणार्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिले होते. त्यामुळे पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तपासचक्रे फिरवून गुन्हेगारावर कारवाईला सुरुवात केली. दरम्यान दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी इंदेवाडी येथील शुभांगी टी हाऊस येथे आकाश कैलास चिप्पा रा. लक्ष्मीनारायणपुरा, मस्तगड जालना हा गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे पोलीसांनी सदरील ठिकाणी जावून त्यास ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल आढळून आले.
या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार देविदास भोजने, भागवत खरात, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, अक्रूर धांडगे, सोपान क्षीरसागर यांनी केलीय.