जालना येथील लोकशाहीर आप्पासाहेब उगले यांना रविवार दि. 11 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता उल्हासनगर येथे प्रसिध्द चित्रपट अभिनेता अशोक सराफ आणि निवेदीता सराफ यांच्या हस्ते कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान उल्हासनगर यांच्या वतीने महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार सोहळा 2024 आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये चित्रपट अभिनेता अशोक सराफ व सिने अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच वेळी जालना येथील लोककला जतन करणारे महाराष्ट्राचे प्रसिध्द लोकशाहीर आप्पासाहेब उगले यांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार 2024 ने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी पुरस्कार सोहळ्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव, उल्हासनगर येथील आमदार कुमार आयलानी यांची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांच्या महाराष्ट्राची लोकगाणी या बहारदार कार्यक्रमाचंही सादरीकरण पार पडलं.