विविध जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या आणि जबरी चोरी करणार्या आरोपीच्या मौजपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला गुन्हे दाखल असलेल्या पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली असल्याची माहिती मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली.
पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनूसार अहमदनगर, नांदेड, बुलढाणा येथील घरफोडी व जबरी चोर्या करणारा तसेच विविध गुन्हयामध्ये फरार असलेला सराईत आरोपी बाबासाहेब कोल्हापुरे शिंदे रा. विरेगाव तांडा ता.जि. जालना हा विरेगाव गावाजवळील दुधना नदीच्या पुलाजवळ मासे पकडत असल्याची गुप्त माहिती मौजपुरी पोलीसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु, पोलीसांना पाहुन आरोपीने नदीमध्ये पाण्यात उडी मारुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात सुमारे 8 गुन्हे दाखल आहेत. त्याची सखोल चौकशी केली असता अहमदनगर, नांदेड व ईतर जिल्हयाधील घरफोडीच्या गुन्हयामध्ये तो फरार आरोपी होता. त्याच्यावर खामगाव शहर पोलीस ठाणे येथे 4 गुन्हे आहेत. बुलढाणा पोलीस ठाण्यात 1, मेहकर पोलीस ठाण्यात 1, नांदेड येथे 1 आणि अहमदनगर येथे 1 असे एकूण आठ गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. सदरील आरोपीला गुन्हे दाखल असलेल्या पोलीस ठाण्याच्या पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आलंय.
ही कार्यवाही अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उप निरीक्षक विजय तडवी, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र वाघ, भगवान खरात, नितीन खरात, दिलीप गोडबोले, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे यांनी केली.