जालना तालुक्यातील काजळा फाटा येथे जालना वन परिक्षेत्राच्या अधिकार्यांनी कारवाई करुन बेकायदेशीर कोळश्याची वाहतुक करणार्या एका चारचाकी वाहनासह 76 कोळश्याच्या गोण्या देखील जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती शुक्रवार दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता वन विभागाच्या अधिकार्याकडून देण्यात आली.
जालना उत्तर विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली. घोटन येथून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जात असलेला कोळसा हा जालना मार्गे जाणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यामुळे वन विभागाच्या अधिकार्यांनी काजळा फाटा येथे सापळा रचुन महिंद्रा बोलेरो वाहन क्र.एमएच.06 बीडब्ल्यू 8809 थांबवुन वाहनाची तपासणी केली. दरम्यान या तपासणीत वाहनामध्ये 76 गोणी विनापरवाना कोळसा असल्याचं आढळून आलं. त्यामुळै कोळसा वाहुन नेणार्याविरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 41 (2), 52 (1) व महाराष्ट्र नियमावली 2014 चे कलम 31 (1), 47 अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर च्या उप वनसंरक्षक सुवर्णा माने, यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक सु.न. मुंढे, जालना उत्तर चे वनपरीक्षेत्र अधिकारी के. डी. नागरगोजे, वनरक्षक कु. एस.बी. जाधव, बदनापूर चे वनपाल कु. आर.डी. दुनगहु, वनरक्षक महादेव कळमकर, वनरक्षक बी.व्ही.घुगे, सुदाम राठोड यांच्यासह इतर कर्मचार्यांनी केली.