भोकरदन येथील गर्भलिंग निदान प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एका संशयीत आरोपीस ताब्यात घेतलं असल्याची माहिती शुक्रवार दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली.
भोकरदन येथील डॉ. राजपुत व इतरावर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. त्यामुळे या प्रकरणात यापुर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपी डॉ. दिलीपसिंग राजपुत यास अटक केली होती. सध्या तो जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आज पुन्हा एक फरार संशयीत आरोपी किशोर ऊर्फ बाळु उत्तम मोहिते रा. पंढरपुरवाडी ता. भोकरदन याला ताब्यात घेतलं. हा मागील काही दिवसापासुन पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पुणे व पिंपरी शहरात चार दिवसापासून आरोपीताचा शोध घेत होते. अखेर संशयीत आरोपी किशोर ऊर्फ बाळु उत्तम मोहिते हा पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवड येथील एक गॅरेज वर काम करीत असतांना मिळून आला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन जिल्हा मध्यवर्ती काराग्रहात पाठविलंय.
ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे, योगेश सहाने, धिरज भोसले यांनी केली.