जालना – कोणत्याही गावात जावून विळे विकण्याचा बहाणा करुन तीथल्या मंदीरात थांबाचे आणि त्याच मंदीरातील सोन्या-चांदीच्या दागीण्यावर हात साफ करुन चोरी करुन पळून जायचे. अखेर चोरट्यांच्या पापाचा घडा भरला आणि देव देखील त्यांच्यावर कोपला. त्यामुळे चोरटे जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकलेत. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीच्या दागीन्यासह 94 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सोमवार दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 वाजता स्थानिक गुन्हे शाखेने दिली.
जालना जिल्ह्यातील आष्टी, गोंदी, अंबड आणि तिर्थपुरी भागात मंदिरात चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी सदरील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी एक पथक स्थापन करुन त्यांना मंदिरातील चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना देऊन मार्गदर्शन केले होतं. त्यानुसार पथकाने तपास करुन गोविंद तानाजी चव्हाण रा. बरकत नगर, गंगाखेड जि. परभणी याला ताब्यात घेतलं. दरम्यान त्याने सदरील गुन्हे हे त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने केल्याची कबूली दिली. त्यामुळे त्याचा दुसरा साथीदार सुनिल वामन पवार रा. किनगाव ता. अहमदपुर जि. लातुर याला देखील पोलीसांनी ताब्यात घेतलं. परंतु, ईतर एक आरोपी मात्र अजून फरार आहे. दरम्यान चोरी करण्यासाठी आरोपी हे विळे विकण्याच्या बहाण्याने गावात आणि मंदिरात प्रवेश करायचे, त्यानंतर मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने व दानपेट्या मधील पैसे चोरुन नेत असल्याची कबुली दिली दोघा आरोपींनी दिली. आरोपीच्या ताब्यातुन मंदिरामधील सोन्या चांदीचे दागिण्यासह गुन्हयात वापरलेली मोटार सायकल, चांदीचा मुकुट, चांदीचे डोळे, सोन्याचे मणी व नथ यासह एकुण 94 हजार 150 रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. दरम्यान त्यांनी केलेले इतर 4 गुन्हे देखील उघडकीस आलेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पहुरे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप, देविदास भोजने, प्रशांत लोखंडे, दत्ता वाघुंडे, कैलास चेके, भागवत खरात, धिरज भोसले यांनी केली.